या पुस्तकातील कविता म्हणजे आखीवरेखीव शब्दशिल्प आहेत, होय शब्दशिल्पच. संवादी जातकुळीची ही कविता आपल्या लयबद्ध शब्दशिल्पांच्या चित्रमयी अक्षरलेण्यात वाचकाला सामावून घेते. मनाचा अंतर्मनाशी संवाद सुरु होतो. ब्रम्हानंदी टाळी लागते. बघता बघता एकेका शब्दांतून आपसूकच आशयसंपन्न अक्षरशिल्पांचा उत्सव कोर्या करकरीत पानांवर काव्यरुपात आपलासा होत जातो. ब्रम्हानंदी पावलेल्या त्या आशयगर्भ अक्षरावस्थेत वाचकाला जी लय सापडते, ती लय इथे पानोपानी पद्यरुपात समेवर आलीय…
बघता बघता आपण त्या आखीवरेखीव अक्षरलेण्यांमधील नजाकतदार प्रतिमा प्रतिकांचे सौंदर्य पाहून क्षणभर अबोल होतो, शब्द मुके होतात आणि मग शब्दांशिवाय अर्थवाही संवाद सुरु होतो. त्याच संवादांचा सुसंवाद होतो, तोच सुसंवाद वाचकांना समेवर घेऊन येतो आणि त्याचेच सुविचार होतात. वाचक कवितेचा व कविता वाचकाची होत जाते. वाचक संवादी होताना कवितेतील आशयसंपन्नतेचा आस्वाद घेत राहतो तेव्हा कवी अलिप्त होऊन पुढील पानावर पुन्हा आशयगर्भ अक्षरलेणी आपल्या लेखणीतून कोरत रहातो.
अगदी त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर ते म्हणतात, उद्याच्या कालवणासाठी भाजी निवडून ठेवणार्या गृहिणीचं कसब बोटात उतरत गेलं. साली, फोलपटं बाजूला करून नेमके दाणे टिपावेत तसं निगुतीने काही टिपण्याची हातोटी आली. त्या सगळ्या सुगराव्यातून जे हाती लागलं, त्याची कविता झाली.
वास्तवाचे भान असणारी अनिल कदम यांची कविता चांगल्याचा पुरस्कार व वाईटाचा तिरस्कार करत विस्तारते आहे, याचा आनंद गगनातीत आहे.
